बोलून बातमी शोधा
23 नोव्हेंबर रोजी भारतात चाणाक्यपुरी येथील शांतिपथावर रशियन दूतावासाशेजारचा अफगाणिस्तानचा दूतावास कायमचा बंद झाला. शांतिपथावरील एका देशाचा दूतावास कायमचा बंद होण्याची ही पहिलीच वेळ. भारत व पाकिस्तान दरम्यानचे राजदूतीय संबंध जवळजवळ संपुष्टात आल्याने तेथेही लक्षणीय हालचाल नाही. भारत व चीनच्या संबंधात दुरावा आला होता, तसेच जेव्हा कोविद-19 चे दिवस होते, तेव्हा या पथावरील चीनचा दूतावास सुमारे दोन वर्ष बंद होता. अन्य देशांचे दूतावासही बंद होते. परंतु, कोविद-19 च्या काळातही राजदूतीय संबंध सुरू होते. देवाणघेवाण सुरू होती.
कॅनडास्थित खालिस्तानवादी शीख नेते हरदीप सिंग निज्जर याचा 18 जून 2023 रोजी खून झाल्यानंतर व त्याबाबत कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडू यांनी भारताला जाहीररित्या जबाबदार धरल्यापासून शांतिपथच्या कोपऱ्यावर असलेले कॅनडियन उच्चायुक्ताचे कार्यालय व भारताचे संबंध इतके ताणले गेले, की कॅनडाला भेट देणाऱ्यांना कॅनडाचा व कॅनडास्थित भारतीयांना व कॅनडियन नागरिकांना भारताचा व्हीसा देण्यास बंदी घालण्यात आली होती. ती काहीशी शिथील झाली असली, तरी तणाव कायम आहे. त्यामुळे दूतावासीय गाठीभेटी बंद आहेत. शांतिपथावरील दूतावासांची ही अवस्था पाहता वरील राष्ट्रांशी भारताचे संबंध किती दुरावले आहेत, याची कल्पना येते.
अफगाणिस्तानचा दूतावास बंद झाल्याची घोषणा अफगाणिस्तानचे भारतातील राजदूत फरीद मामुंडझे यांनी लंडनहून केली. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली. त्यापाठोपाठ सरकारने अफगाणिस्तानातून भारतात येऊ पाहणाऱ्या अफगाणी नागरीक, विद्यार्थी यांना व्हिसा देण्यास बंदी केली. ती आजही कायम आहे. त्यामुळे असंख्य निरपराध अफगाणी नागरिकांवर संकट कोसळले. तालिबानच्या कठोर व जाचक सत्तेखाली ते व असंख्य महिला भरडल्या जात आहेत. दरम्यानच्या काळात भारत व तालिबान सरकारचे संबंध असून नसल्यासारखे होते. आजही भारताने तालिबान सरकारला औपचारिक मान्यता दिलेली नाही. दूतावास बंद असला तरी हैद्राबाद व मुंबई येथील अफगाणिस्तानच्या कौन्सुलेट्स सुरू असल्याचा दावा केला जात आहे. 1 ऑक्टोबर पासून दूतावासात बंद असल्याचे सांगितले जात होते, तरीही परराष्ट्र मंत्रालयानुसार “तो चालू होता.’’ राजदूत मामुंड्झे यांच्यानुसार, “काही अत्यावश्यक (इमर्जन्सी) कामासाठीच तो सुरू होता. भारत सरकार अफगाणिस्तानच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना व्हिसा व अऩ्य सवलती देत नाही,’’ अशी त्यांची तक्रार आहे. तथापि, त्याचे खंडन परराष्ट्र मंत्रालयाने केले. `द वायर’ या ऑनलाईन पोर्टलनुसार,“ अफगाणिस्तानच्या मुंबई कौन्सुलेटच्या प्रमुख श्रीमती झकीया वारदाक व हैद्राबादमधील कौन्सुलेटचे कार्यकारी प्रमुख सईद महंमद इब्राहीमखिल हे लौकरच दिल्लीतील दूतावासाचा ताबा घेतील, असे सांगितले जात होते.’’ झकीया वारदाक यांनी फेसबुकवर दिलेल्या माहितीनुसार, “परराष्ट्र मंत्रालयातील संयुक्त सचिव जे.पी.सिंग व त्यांच्या सहकारी श्रीमती दीप्ती झारवाल यांच्याबरोबर झालेल्या आमच्या बैठकीनंतर दूतावास चालू राहील, असे आश्वासन तेथील उरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले.’’ दूतावासाची इमारत भारत सरकारच्या स्वाधीन केल्याचेही वृत्त आहे. परिस्थिती गुंतागुंतीची व गोंधळाची असली, तरी भारत सरकार व तालिबान सरकार यांच्यात अनौपचारिक व गुप्त पातळीवर काही चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. आजही काबूलमधील भारताच्या दूतावासात अत्यावश्यक कर्मचारी कार्यरत आहेत.
या दूतावासाचे कामकाज अत्यंत सुरळीतपणे व दुतर्फा सौहार्दाने चालत होते, ते माजी अध्यक्ष हमीद करझाई (2002 ते 2014) व नंतर आलेले अध्यक्ष अश्रफ घनी अहमदझाय (2014 ते 2021) यांच्या कारकीर्दीत. त्या काळात अफगाणिस्तानचे डॉ सईद मखदूम रहीन, अब्दुल रहमान पझवाक, मसूद खलीली, शायदा महंमद अब्दाली व फरीद मामुंडझे या पाच राजदूतांच्या नेमणुका भारतात झाल्या. त्यातील रहीन ते काहीसे भित्रे व सावधान राजदूत होते. `इंडियन असोसिएशन ऑफ फॉरेन अफेअर्स करस्पाँडंट्स’ या संघटनेचा निमंत्रक या नात्याने मी त्यांना असोसिएशनबरोबर वार्तालाप करण्याचे आमंत्रण देण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांना काबुलच्या प्रसिद्ध सुक्यामेव्यासह स्वागत केले व `मी येईन,’ असा होकारही दिला. परंतु, ते कधीच आले नाही. पुन्हा त्यांची भेट घेता, भीती व्यक्त करीत ते म्हणाले, की मी काही बोललो, तरी मी भारताच्या वतीने बोलतोय, असे पाकिस्तानला वाटेल व गुंतागुंत अधिक वाढेल. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. परंतु, मसूद खलीली, शायदा महंमद अब्दाली व फरीद मामुंडझे हे अत्यंत धाडसी राजदूत होते.
खलीली हे नॉर्दर्न अलायनन्सचे सर्वोच्च नेते अहमद शाह मासौद (लायन ऑफ पंजशीर) यांचे निकटचे सहकारी. त्यांच्या उपस्थितीत तालिबानच्या दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी आपण पत्रकार असल्याचे सांगून त्यांची मुलाखत घेण्याचा बहाणा सांगून केलेल्या बॉम्ब स्फोटात अहमद शाह मासौद यांचा मृत्यू झाला. खलीली यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला. भारतानंतर खलीली अफगाणिस्तानचे तुर्की व स्पेनमधील राजदूत होते. तर, शायदा महंमद अब्दाली यांची माझी घनिष्ट मैत्री झाली. त्यांनी आमच्या संघटनेबरोबर तीन वेळा वार्तालाप केला. तसेच, खलीली यांनीही प्रतिसाद दिला. त्या निमित्ताने अब्दाली, खलीली, मामुंड्झे यांच्या कारकीर्दीत अनेक वेळा दूतावासात येणेजाणे, चर्चा झाल्या. करझाई सरकारमध्ये अब्दाली हे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार होते. त्यांचे व्यक्तिमत्व उमदे व पाकिस्तानला अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत सातत्याने जाहीरपणे जबाबबदार धरणारे होते. दरवर्षी अफगाणिस्ताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त होणाऱ्या सोहळ्याचे ते आमंत्रण पाठवित. नंतर तालिबान जसजसे अफगाणिस्तानरील पकड कायम करू लागले, तसे अध्यक्ष अहमदझाय यांच्या कारकीर्दीत त्यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश करण्याचे ठरविले. त्यानंतर ते काबुलला परतले, तेव्हापासून त्यांचा सम्पर्क झालेला नाही. त्यांच्या कारकीर्दीत अफगाणिस्तान दूतावासातील उपप्रमुख महंमद अश्रफ हैदरी यांचा बराच सम्पर्क आला. नंतर ते अफगाणिस्तानचे श्रीलंकेतील राजदूत झाले. परंतु, तालिबानने सत्ता काबीज केल्यावर ते `साउथ एशिया कोऑपरिटीव एनव्हायन्रमेन्ट प्रोग्राम’ या संस्थेच्या महासंचालक पदावर कार्य करीत आहेत.
या सर्व राजदूतांचे खास वैशिष्ठ्य म्हणजे, हैदरी हे पत्रकार, संपादक, अँकर, मसौद खलीली हे भाषाविद, कवि, लेखक, दिल्लीतील करोरी मल या विद्यालयाचे माजी विद्यार्थी, डॉ रहीन हे पर्शियन लेखक, फारसी तज्ञ (नंतर ते अफगाणिस्तानचे माहिती व सास्कृतिक मंत्री झाले), राजदूत पझवाक हे दरी भाषेतील लेखक, तर शायदा महंमद अब्दाली यांनी व्युहात्मक विषयात जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालायातून पीएच डीची पदवी संपादन केली.
तालिबानच्या गेल्या दोन वर्षांच्या सत्ताकाळात यातील काही राजदूत परदेशात गेले. मसौद खलिली यांनी माझे स्नेही महेंद्र वेद याना काल पाठविलेल्या व्हॉट्सअप निरोपात म्हटले आहे, आलेल्या 19 वर्षांच्या स्वातंत्र्याला आता पूर्णविराम मिळाला असून, वर उल्लेखिलेल्या राजदूतांपैकी काही परदेशात गेले, तर काही विषयी माहिती उपलब्ध नाही. मसौद खलीली यांनी स्नेही महेंद्र वेद यांना अलीकडे पाठविलेल्या व्हॉट्सअप निरोपात म्हटले आहे, की अफगाणिस्तानमधील आताची परिस्थिती व 1996 मधील परिस्थिती यात मोठा फरक आहे. त्यावेळी उत्तरेत सरकार होते. नॉर्दर्न अलायन्सच्या नेतृत्वाखाली अएक्य होतं. पण अफगाणिस्तानमध्ये आता सारेच विस्कळीत व विखुरलेले आहे. उत्तर प्रांतातील नेतृत्व अतिशय कमकुवत आहे. 1996 मध्ये आम्ही डोंगर दऱ्यातून (तालिबानविरूद्द) लढा देत होतो, पश्चिमेतून, तुर्की अथवा दुशानबेमधून नव्हे. त्यावेळी भारत हे एकमेव राष्ट्र होते, की त्याने आम्हाला साह्य दिले.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.